छत्रपती संभाजीनगर: बऱ्याचदा वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जातात. नियम तोडून वाहन चालवल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस सतर्क असून छत्रपती संभाजीनगर मध्ये कडक मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या आणि ई-चलनद्वारे दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवी करण्यात येणार असून वाहन देखील जप्त करण्यात येणार आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी माहिती दिलीये.
advertisement
गेल्या 10 वर्षांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. अरुंद रस्ते, अपुऱ्या सोयी- सुविधांमुळे वाहतुकीचा कोंडी होण्याचे प्रमाणही वाढले. महापालिका, पोलीस प्रशासन सुरळीत वाहतुकीसाठी सातत्याने प्रयत्न करूनही यश येत नाहीये. गेल्या काही वर्षांत वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच नियम मोडणाऱ्यांसाठी मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आलीये. तरीही काहीजण वेळेत दंड भरत नाहीत. त्यांच्यावर वाहतूक पोलीसांची नजर असणार आहे.
उलट दिशेने जाणे, सुसाट वाहने पळवणे, हातात मोबाइल धरून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट व अनेक प्रकारे वाहतुकीचे सर्रास नियम मोडले जातात. अशा वाहन चालकांवर गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे 1 लाख 98 हजार 589 वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडण्यात आले. तसेच त्यांच्यावर 19 कोटी 42 लाख 86 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
तर वाहन जप्त होणार
2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी 1 लाख 98 हजार 589 वाहनचालकांना 19 कोटी 42 लाख 86 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यातील 11 हजार 78 वाहनधारकांनी 1 कोटी 10 लाख 24 हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर उर्वरित वाहन चालकांचा दंड प्रलंबित आहे. त्यामुळे जर तुमच्या वाहनावरती कुठल्याही प्रकारचा दंड असेल तर तो तुम्ही लवकरात लवकर भरून टाकावा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन टाळून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.