राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांना साथ दिली. सतीश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. सतीश चव्हाण यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका करणारे पत्र लिहिले. या पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. या पत्राची चर्चा सुरू असताना सतीश चव्हाण थेट नॉट रिचेबल झाल्याने आता त्यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
advertisement
सतीश चव्हाण यांनी पत्रात काय म्हटले होते?
मराठा, मुस्लिम, धनगर आणि आदिवासी आरक्षणाबाबत सरकारला अपयश आले असल्याची टीका सतीश चव्हाण केली. बहुजनांचा आवाज दडपण्याचे काम या महायुती सरकारने वेळोवेळी केले. अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकार बहुजन समाजाला न्याय देऊ शकले नसल्याची खदखद आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवेल असे आम्हाला वाटले होते. पण मागे काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले, त्यावेळी ‘पटेल आणि गुर्जर आंदोलन हाताळले तसे महाराष्ट्रातील आंदोलन हाताळू’ असे विधान त्यांनी केले. त्या विधानामुळे मराठा समाजात आज संतापाची भावना असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली.
कोणती राजकीय भूमिका घेणार?
महायुती सरकारच्या विरोधात पत्र लिहिणारे आमदार सतीश चव्हाण नॉट रिचेबल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. सरकार विरोधात पत्र लिहिल्यापासून सतीश चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल आहे. सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.
अजित पवार किंवा महायुतीच्या नेत्यांचा संपर्क होऊ नये म्हणून फोन बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार की अपक्ष लढणार याबाबत संभ्रम कायम आहे. सतीश चव्हाण मुंबईत मोठ्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
