मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनासाठी नाथसागर जलाशयातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येत आहे. रविवारी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या दरम्यान नाथसागर जलाशयातून गोदावरीत विसर्ग वाढवण्यात आला. धरणाचे 18 दरवाजे अर्धा फुटाने उघडल्यामुळे 1 लाख 41 हजार 480 क्युसेकचा विसर्ग गोदावरीत होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना धोका वाढला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
Devgiri Fort: देवगिरी किल्ल्यावर फिरायला जाताय? आता चूक महागात पडणार, नवे नियम लागू होणार
18 दरवाजातून वाढवला विसर्ग.
आज, 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाचे द्वार क्र 10 ते 27 असे एकूण 18 (नियमित द्वार) दरवाजे अर्धा फूट उचलून 5.5 फूट पर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक इतका विसर्ग वाढवला होता. त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण 18 (नियमित) व 09 (आपत्कालीन) दरवाजातून 1 लाख 32 हजार 48 आणि 9432 क्युसेक असा एकूण 1 लाख 41 हजार 480 क्युसेकने विसर्ग सुरू होता.
दुपारी पुन्हा विसर्ग वाढवला.
जायकवाडी धरणातून दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या दरम्यान पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे 1 ते 9 असे 9 आपत्कालीन दरवाजे अर्ध्या आणि पुन्हा अर्ध्या फुटाने उचलून 5 फुटापर्यंत उघडण्यात येणार आहेत. यातून गोदावरी पात्रात 9432 क्युसेक इतका विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात एकूण 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवाजातून 1 लाख 98 हजार 72 क्युसेकने विसर्ग सुरू राहील.
दरम्यान, आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.