निंभोरा गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील शेतात राहणाऱ्या जान्हवीसाठी रोजची ये-जा म्हणजे जणू एखादी परीक्षा. पाचोरा महाविद्यालयात जाण्यासाठी तिच्या शेताच्या बांधावरूनच एसटी बस जात असली, तरी अधिकृत थांबा गावातील बसस्थानकात असल्याने तिला रोज दीड किलोमीटर पायी चालत जावे लागे. सकाळच्या अंधारात किंवा सांजवेळी हा प्रवास करणे धोकादायकही ठरत होते.
वडिलांसह दुचाकीवरून जात होता चिमुकला, अचानक रक्तानं शर्ट माखला, छ. संभाजीनगरात काय घडलं?
advertisement
रोजचा त्रास पाहून काही वेळा कुटुंबीयांवर शिक्षण थांबवण्याची वेळ आली. पण शिक्षण न सोडण्याचा निश्चय करत जान्हवीने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवली. ग्रामीण मुलीला आलेल्या या अडचणीची दखल मंत्र्यांनी तात्काळ घेतली आणि जळगाव व छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिकाऱ्यांना त्वरित आदेश दिले.
यानंतरची घटना पाटील कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरली. जळगाव विभाग नियंत्रक दिलीप बंजारा आणि पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील हे थेट तिच्या शेतात जाऊन बसथांबा मंजूर झाल्याची माहिती देताच कुटुंबीयांना क्षणभर विश्वासच बसला नाही. प्रशासनाने एवढ्या तत्परतेने प्रतिसाद देणे हीच त्यांच्या दृष्टीने मोठी आनंदवार्ता ठरली.
शेताच्या बांधावरच बसथांबा मिळाल्यामुळे आता जान्हवीचे शिक्षण अधिक सुकर झाले आहे. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणात वाहतूक हा सर्वात मोठा अडथळा मानला जातो. पण जान्हवीच्या धाडसाने आणि प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेमुळे हा अडसर दूर झाला.
ही छोटी पण महत्त्वाची घटना एका विद्यार्थिनीचे आयुष्य बदलून गेलीच, पण ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील अडचणी आणि त्यावर होऊ शकणाऱ्या उपायांचीही चर्चा पुन्हा एकदा पुढे आणणारी ठरली आहे.






