डोळ्यांना पट्टी बांधली अन् बेदम मारहाण
शकील आरेफ शेख (30, रा. फुलेनगर) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्याच काही मित्रांनी मोबाईल आणि पैशांच्या चोरीच्या संशयावरून त्याचे आयुष्य संपवलं. जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरावर नेऊन आरोपींनी आधी शकीलच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, हत्येपूर्वी त्याच्या पायाला सिगारेटचे चटके देऊन त्याचा अमानुष छळ करण्यात आला. 6 जानेवारी रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, त्यानंतर आरोपींनी त्याचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे खून केला.
advertisement
शकीलच्या आईला फोनवर धमकी
याप्रकरणी पोलिसांनी सय्यद सिराज अली ऊर्फ मोठा सिराज याला अटक केली आहे. छावणी पोलीस ठाण्यात मोठा सिराजसह छोटा सिराज, जब्बार, कबीर आणि अन्य एका अशा एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा भाऊ सलमान याने दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी आरोपी सिराजने शकीलच्या आईला फोन करून धमकी दिली होती, तेव्हापासूनच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. आरोपींनी 4 जानेवारीला त्याला पार्टीच्या बहाण्याने जटवाडा परिसरात नेलं, तिथं नशा केल्यानंतर हा अघोरी प्रकार केला.
पोलीस दलात हद्दीवरून मोठा वाद
दरम्यान, मृतदेहाचा शोध लागल्यानंतर दौलताबाद आणि छावणी पोलीस दलात हद्दीवरून मोठा वाद रंगला होता. मृतदेहाचे डोके एका हद्दीत तर धड दुसऱ्या हद्दीत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने, गुन्हा नक्की कुठे नोंदवायचा यावर दिवसभर खल सुरू होता. अखेर ज्याठिकाणी रक्ताचे डाग आणि संघर्षाच्या खुणा जास्त होत्या, त्या छावणी पोलीस ठाण्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार हा तपास आपल्या हाती घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाईला वेग दिला आहे.
