कृष्णा कुलकर्णी हे मूळचे जालना जिल्ह्यातील परतुरचे आहेत. नोकरी निमित्त ते छत्रपती संभाजीनगर शहरात स्थायिक झाले. ते संभाजीनगर शहरातील दत्ताजी भाले रक्तपेढी या ठिकाणी कार्यरत आहेत. “मला दत्ताजी भाले रक्तपेढी या ठिकाणी नोकरी लागली. नोकरी जेव्हा लागेल तेव्हा मला रक्तदान करणे काय असते किंवा आपला रक्त गट कोणता असतो? याविषयी काहीच माहिती नव्हती,” असं कुलकर्णी सांगतात.
advertisement
कुलकर्णी पुढे सांगतात की, “माझ्या सहकाऱ्यांनी मला विचारलं तुझा रक्तगट कुठला आहे? तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर मी पहिल्यांदा माझा रक्तगट चेक केला आणि त्यानंतर मला माझा रक्तगट समजला. माझा रक्तगट चेक केल्यानंतर माझे सहकारी मित्र होते त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले की तुझा जो रक्तगट आहे तो खूप कमी जणांचा असतो. त्यावेळी मला काही समजले नाही. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुझा ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगट आहे. मी तेव्हापासूनच रक्तदान करायला सुरुवात केली.”
“जेव्हा पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा मी 29 वर्षाचा होतो. सध्या माझं वय 59 वर्ष आहे. एवढ्या वर्षांमध्ये मी शंभर पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेले आहे. पहिल्यांदा रक्तदान केले तेव्हा मला कसल्याच प्रकारची भीती वाटली नाही. मी सुरुवातीला वर्षा मधून चार वेळा रक्तदान करायचो आणि आता वर्षातून दोन किंवा तीन वेळा रक्तदान करतो,” असेही ते सांगतात.
आपण सर्वांनी रक्तदान करणं गरजेचं आहे. रक्तदान केलं तर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. आपल्याला धोकादायक आजार होत नाहीत. आपल्या वेळोवेळी तपासण्या होत राहतात. तसेच रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचतो. यामुळे आपण सर्वांनी रक्तदान करावे, असं आवाहन देखील कृष्णा कुलकर्णी करतात.