छत्रपती संभाजीनगर : अधिकारी व्हायचे प्रत्येकाचे स्वप्न असते. अधिकारी व्हायचे म्हटले तर त्यासाठी अहोरात्र प्रयत्न आणि अभ्यास कराव्या लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. पण यामध्ये प्रत्येकालच यश येईल, असे नाही. यामध्ये अपयश आले तर काही जण निराश होतात. पण निराश न होता, तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करुन त्यातही चांगली प्रगती करू शकता, हे एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. आज याच व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
मनोहर सूर्यवंशी यांची ही कहाणी आहे. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. त्यांचे आई-वडील हे शेतीकाम करतात. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना चांगली नोकरी करायची होती. सरकारी नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून ते छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आले.
मनोहर आणि त्यांचा भाऊ राम हे दोघेजण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी संभाजीनगर शहरात आले. छत्रपती संभाजीनगर शहरात आल्यामुळे त्यांचा आर्थिक खर्चदेखील वाढला. या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीत राहायचे. या खोलीचे भाडे म्हणून 3 हजार रुपये त्यांना द्यावे लागायचे.
मेसचा डब्बासाठीही त्यांना महिन्याला 3 हजार रुपये खर्च यायचा. त्यासोबतच लायब्ररीचा देखील त्यांना खर्च यायचा. असा त्यांचा महिन्याकाठी त्यांना एकूण 10 ते 12 हजार रुपये खर्च यायचा. एवढे पैसे त्यांना घरुन घेणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी सुरुवातीला पेपर टाकायला सुरुवात केली. त्यांनी काही दिवस लोकांच्या घरी जाऊन पेपर टाकले. त्यानंतर परत ते पेपरचा स्टॉल लावायला लागले. तिथे पण 10 वाजेपर्यंत सकाळी पेपर ते विकायचे आणि त्याच्यानंतर ते परत लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचे.
त्यांनी हे साधारण 3-4 वर्षे केले. पण त्यामध्ये देखील त्यांच्या असं लक्षात आले की, एवढे कष्ट करून देखील आपल्याला यश येत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये देखील जागा निघत नव्हत्या. पेपरचे घोटाळे व्हायचे. त्यामुळे त्यांनी आता आपण स्पर्धा परीक्षा न करता काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा, असे ठरवले. यानंतर त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
चहाचा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तर त्यांनी त्यांच्या काही मित्रांकडून पैसे उसने घेतले आणि शहरातील औरंगपुरा भागांमध्ये एक गाळा भाड्याने घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी चहा विकायला सुरुवात केली. पण सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या चहाची विक्री झाली नाही. त्यामुळे आपण या व्यवसायामध्ये येऊन काही चुक तर नाही केली ना, असे त्यांना वाटायचे. पण राम आणि मनोहर यांनी तसेच काही दिवस दुकान चालवले आणि मग हळूहळू त्यांचा दुकान चालायला लागले.
आता सध्या त्यांचे दुकान हे व्यवस्थितरित्या चालत आहे. ते या ठिकाणी चहा त्यासोबत नाश्त्यासाठी पुलाव, पोहे आणि मटकी हे पदार्थ विकतात. या ठिकाणी नाश्त्यासाठी सकाळी खूप गर्दीदेखील असते. आज ते दोघेजण महिन्यासाठी 50 ते 60 हजार रुपये कमवत आहेत, असे मनोहर यांनी सांगितले. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.