छत्रपती संभाजीनगर : कधी वंशाचा दिवा हवा म्हणून, तर कधी अनैतिक संबंधांचे परिणाम लपवण्यासाठी, काही निर्दयी जन्मदात्यांनी पोटच्या गोळ्याला रस्त्यावर सोडून दिल्याच्या बातम्या वाचून मन सुन्न होते. अशा घटनांवर आपण दु:ख व्यक्त करतो, रागही येतो, पण काही काळाने त्या घटना विसरल्या जातात. मात्र, या वंचित चिमुकल्यांना उब देण्याचं कार्य 1994 पासून छत्रपती संभाजीनगरमधील 'साकार' ही सामाजिक संस्था करत आहे.
advertisement
साकार ही संस्था ज्योती नगरमध्ये कार्यरत असून, रस्त्यावर टाकलेल्या किंवा अनाथ बालकांना घर आणि मायेची ऊब देते. 0 ते 6 वयाच्या लहान बालकांना सांभाळण्याची जबाबदारी ही संस्था पेलते. 20 बालकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या या संस्थेत, 10 बालकांचा खर्च शासन करतं, तर उर्वरित 10 बालकांचा खर्च संस्था स्वतः उचलते.
1994 पासून आजपर्यंत साकारने 585 बालकांना आधार दिला आहे. त्यापैकी 425 बालकांचं पुनर्वसन यशस्वीपणे करण्यात आलं आहे. यात 186 मुलं आणि 235 मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही मुलांचं पुनर्वसन परदेशातही झालं आहे. स्पेशल चाइल्ड असणाऱ्या मुलांना परदेशात स्वीकारलं गेलं आहे, हे या संस्थेचं मोठं यश आहे.
या संस्थेत मुलांना दत्तक देण्याची प्रक्रिया अतिशय नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते. साकारच्या अध्यक्षा, डॉ. नीलिमा पांडे म्हणतात, "आम्हाला चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले आहेत. पण मुलांना नवीन आयुष्य देण्याचा जो आनंद आहे, तो शब्दात मांडता येणार नाही."
साकारचं काम फक्त मुलांना सुरक्षित वातावरण देण्यापुरतं मर्यादित नाही. ती या मुलांचं संपूर्ण पुनर्वसन करत, त्यांना समाजात चांगलं आयुष्य मिळवून देण्याचा प्रयत्न करते. अशा संस्थेमुळेच वंचित बालकांचं आयुष्य एका चांगल्या दिशेला जातंय, हे नक्की.