महाराष्ट्रातील मूळचे अमरावतीचे असलेले न्या. भूषण गवई यांनी १४ मे रोजी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात न्यायपालिकेची जबाबदारी गेल्याने महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले. मुंबईत झालेल्या खास सोहळ्यात न्या. गवई यांना सन्मानित करण्यात आले. परंतु या सोहळ्याला नोकरशाहीकडून सरन्यायाधीशांना न दिलेल्या शिष्टाचाराच्या नाराजीची किनार राहिली. सरन्यायाधीश गवई यांनी ही नाराजी जाहीर भाषणातून बोलून दाखवली.
advertisement
मुद्दा माझ्या अवमानाचा नाही पण संविधानाच्या एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेला दिलेल्या वागणुकीचा!
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, मला राजशिष्टाचाराचे मुळीच कौतुक नाही. मी आजही अमरावती नागपूरला जातो तेव्हा मित्रांच्या दुचाकीवरून फिरतो. नागपूर अमरावतीला जाताना कधीही पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. मला त्याचे अजिबात विशेष कौतुक नाही. पण न्यायपालिकेचा प्रमुख एखाद्या राज्यात येत असेल, ते ही त्याच्या स्वत:च्या राज्यात, तेव्हा संविधानाच्या एका संस्थेकडून (नोकरशाही) दुसऱ्या संस्थेला कशी वागणूक दिली जाते, हा मूळ प्रश्न आहे.
सरन्यायाधीश महाराष्ट्र दौऱ्यावर येत असताना राज्याचे मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त यांना उपस्थित राहू वाटत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु ही वागणूक योग्य आहे का? याचा त्यांनी जरूर विचार करावा, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
सरन्यायाधीश गवई यांची जाहीर नाराजी, अधिकाऱ्यांची धावाधाव, पुढच्या तासात दादरला हजर
सरन्यायाधीश गवई यांनी भाषणातून जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी तत्काळ दादर गाठले. दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर अर्थात चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी गेलेले सरन्यायाधीश गवई यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकारी दिलगिरी व्यक्त करीत असतानाची क्षणचित्रे समाज माध्यमांवर वेगाने पसरली.