मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम असल्याने मुख्यमंत्री फडणवीस विविध नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
ओबीसी प्रवर्गावरही अन्याय होऊ देणार नाही
मराठा समाजाचे निर्णय आमचे सरकार असतानाच घेतले गेले. मी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निर्णय घेतले. दुसऱ्या कोणत्याही पक्षाने निर्णय घेतले नाही. आताही मराठा समाजाचे प्रश्न आम्ही सोडवू. पण ओबीसी प्रवर्गावरही अन्याय होऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
advertisement
आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून...
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनाचे यापूर्वी काय झाले? हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आजही मराठा आरक्षण आंदोलनासाठी कोण मदत करत आहे, हे ही सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकरिता हे आंदोलन राजकीय नाही. जरांगे पाटील यांचे आंदोलन आम्ही सामाजिक आंदोलन समजतो. काही राजकीय पक्ष आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांचे नुकसान होईल, फायदा होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसीमध्ये आधीच ३५० जाती, तरीही...
सगेसोयरे मागणीची अंमलबजावणी करून ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवे, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मराठा समाजासाठी वेगळे १० टक्के आरक्षण दिल्याकडे लक्ष वेधून ते न्यायालयातही टिकल्याचे आवर्जून सांगितले. लोकशाही मार्गाने आंदोलन होणार असेल तर आमची हरकत असण्याचे काही कारण नाही. चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू. पण मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊनही आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. ओबीसी प्रवर्गात आधीच ३५० जाती आहेत. तरीही आम्ही त्यांच्या मागण्या जाणून घेऊ.