पुण्यातील सभेत अमित शहांनी फडणवीसांना बळ देण्याबाबत उल्लेख केला होता. तर मुख्यमंत्रिपदावरून काही वाद आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर शिंदे म्हणाले की, शाहांनी फडणवीसांना पुन्हा आणणार असं म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं होतं की, महायुती आणि फडणवीसांचा विजय निश्चित करा.
दुसऱ्या एका सभेत त्यांनी आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहोत. निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. शहांनी फडणवीसांना उमेदवार म्हणून, ते सुद्धा निवडणूक लढवत आहेत. आमच्यात मतभेद नाहीत आणि कोणत्याही समस्या नाहीत. आमचं एकच ध्येय आहे ते म्हणजे पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
advertisement
जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा महायुतीवर काय परिणाम होईल? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, मराठा समाजाला जे वचन दिलं ते पूर्ण केलं. आम्ही १० टक्के आरक्षण दिलं, इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामुळे आम्हाला फायदा झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यानी मराठा समाजाला आरक्षण दिलं. मुंबई उच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकलं. पण सरकार बदलताच महाविकास आघाडीला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही.
आता समाजालाही वाटतंय की सरकार त्यांच्यासाठी प्रयत्न करतेय. आधीचे सरकार जे आता विरोधात आहेत त्यांनी मराठ्यांचा फक्त मतांसाठी वापर केला. मराठ्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं. त्यामुळे आता मराठा समाज याचा नक्की विचार करेल अशी आशा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
