उत्तरेकडून थंड वारे
पुढच्या 48 तासात मध्य प्रदेश, हिमाचल आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी विदर्भात थंडीची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. स्वेटर काढा, शेकोटी पेटवा, कारण थंडीची तीव्र लाट येत्या 48 तासांत येणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात चांगलीच घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
दक्षिणेकडून मुसळधार पाऊस
दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र मुसळधार पाऊस राहणार आहे. केरळ आणि तामिळनाडू राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज 13 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे दक्षिणेकडून पाऊस आणि उत्तरेकडून थंड वारे यामुळे महाराष्ट्रातलं हवामान चांगलंच बिघडलं आहे. दुपारी उष्ण वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
चार सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामानात बदल
हवामान तज्ज्ञ उमशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार चार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका भारताला आहे. एक उत्तरेकडे आहे. तर दुसरं दक्षिणेकडील राज्यांवर सायक्लोनिक सर्क्युलेशन स्थिती तयार झाली आहे. उर्वरित दोन पश्चिम बंगालच्या उपसागरात आहेत. त्यामुळे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात बदल होत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये किमान तापमानात कोणतीही घट होणार नाही. पुढचे पाच दिवस तापमान थंड राहणार आहे.
महाराष्ट्रात 3 दिवस कसं राहील हवामान?
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 3 दिवस खूप मोठे बदल होणार नाहीत. मात्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राशेजारील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येणार असून ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. सीमारेषेवर असलेल्या राज्यांमध्ये थंडीची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे.
विदर्भासाठी यलो अलर्ट
१२ आणि 13 तारखेला विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15-16 नोव्हेंबर रोजी वातावरण थंड राहील मात्र कोणताही इशारा देण्यात आला नाही अशी माहिती हवामान तज्ज्ञ उमशंकर दास यांनी दिली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. ला निनामुळे यंदा थंडी जास्त वाढण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं होतं.
