जळगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक राजकारणात कुजबुज रंगली आणि अवघ्या काही दिवसांत चित्रच पालटलं. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक मोठा चेहरा आणि लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
प्रतिभा शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकारण माहिती असलेला एक मोठा चेहरा काँग्रेसनं गमवल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे त्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने अजितदादांची ताकद वाढणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे.
advertisement
प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सलग भेट घेतली. बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. इतकंच नाही तर वडेट्टीवार आणि चेन्नीथल यांनाही भेटले होते. मुकुल वासनिक यांना एक दोन नाही तर 30 फोन केले, मेसेज पाठवून बोलण्याचा प्रयत्न केला.
शेवटी, 23 जून रोजी मी राहुल गांधींना भेटले. त्यावेळी मी स्पष्ट सांगितले की, आता माझ्यासाठी काँग्रेसमध्ये काम करणे शक्य नाही. माझा आवाज सतत दाबला जात आहे, आणि मी असा आवाज दाबू देणाऱ्यांपैकी नाही. जिथे काम करण्याची संधी मिळत नाही, तिथे मी राहू शकत नाही. आपल्या कामाची पक्षाने दखल घेतली नाही आणि विचारात घेतले जात नसल्यामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसला रामराम करत त्यांनी आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 17 ऑगस्ट रोजी जळगावमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.