राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. आपल्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी नागपूरपासून केली. नागपूरमध्ये आगमन झाल्यावर त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरेश भट सभागृहात आयोजित संविधान सन्मान संमेलनाला संबोधित केले. राहुल यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलायचे तेव्हा त्यांचा आवाज हा कोट्यवधी शोषित समूहाचा आवाज होता. बाबासाहेब बोलायचे तेव्हा दुसऱ्यांचं दुःख त्यांच्या तोंडून निघत होते. जेव्हा आपण आंबेडकर, गांधीची चर्चा करतो तेव्हा आपण एका व्यक्तीबाबत बोलत नाही असे राहुल यांनी म्हटले.
advertisement
राहुल यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, काँग्रेस नव्हे तर देशातील जनतेने बाबासाहेबांना संविधान बनवण्यास सांगितले. देशात कोट्यवधी दलित आहेत, त्यांचे दु:ख, त्यांचा आवाज या संविधानात यायला हवा अशी त्यांचे म्हणणे होते. या संविधानात फुले, आंबेडकर आणि गांधी यांचा आवाज आहे. आपण संरक्षण करतोय ते हजारो वर्ष जुन पुस्तक आहे. देशात आम्ही एक दुसऱ्यांचा आदर करणार, असे म्हटले आहे. यात कुठे लिहीलं नाही एक व्यक्ती देशातील धन, भविष्य घेऊ शकेल. यात लिहिले की इथे समानता आहे.
संघाचा संविधानावर लपून हल्ला...
भाजप, संघ या संविधानावर आक्रमण करत आहे. त्यांचा हा हल्ला देशाच्या आवाजावर हल्ला असल्याचे राहुल यांनी सांगितले. संविधानामुळे निवडणूक आयोग आणि इतर संस्था निर्माण झाल्या आहेत. संघ संविधानावरून समोरून हल्ला करू शकत नाही. समोरून वार केल्यास ते पाच मिनिटात हरतील, हे त्यांना ठाऊक आहे आणि म्हणूनच हे लपून हल्ला करतात. विकास, प्रगती अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून येतात आणि संविधानावर हल्ला करतात, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
जातनिहाय जनगणना होणारच...
राहुल गांधी यांनी म्हटले की, मी जातीय जनगणना करण्याची हाक दिली आहे. जातीय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे. देशात 90 टक्के लोकांजवळ काही ताकद नाही. याचा काय अर्थ? बिना शक्ती, संपत्ती सन्मानाचा काय फायदा असा सवालही त्यांनी केला. मोठ्या अधिकाऱ्यांच्या यादीत ओबीसी, दलितांची नावे नाहीत. न्यायव्यवस्था, मोठे अधिकारी पाहा, यांच्यात 90 टक्के भारत दिसत नाही.
पाच टक्के लोक देशाला चालवत असून कर्नाटकात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तर माझ्यावर टीका झाली असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. जातीय जनगणना म्हटलं तर मोदीजी यांची झोप उडाली. मोदीजी यांचा चेहरा बदलला असल्याचे त्यांनी म्हटले. पण, आता काहीही करा जात जनगणना होणार आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा तोडणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. या देशातील 90 टक्के लोक देशाच्या प्रगतीच्या प्रक्रियेत सहभागी नसल्याचे राहुल यांनी म्हटले.
