याशिवाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अशात आता काँग्रेसचे १० नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. चंद्रपुरात भाजपला २३ जागा मिळाल्या असून सत्तास्थापनेसाठी त्यांनी १० ते ११ नगरसेवकांची आवश्यकता आहे. अशात इथं काँग्रेसला भगदाड पडलं तर चंद्रपुरात भाजपचा महापौर होण्याची शक्यता आहे.
advertisement
या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे. तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत भाजपचा संवाद सुरू आहे. या आठवड्यात आमच्या गटनोंदणी करण्याकरिता अर्ज दाखल केला जाणार आहे. ठाकरे गटाने महापौर पदाची इच्छा व्यक्त केली आहे. शेवटी एखादा पक्ष इच्छा व्यक्त करतो, नंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होतो, असंही मुनगंटीवार म्हणाले.
काँग्रेसच्या फुटीबद्दल बोलताना मुनगंटीवारांनी सांगितलं की, चर्चा सर्वांच्याशी सुरू आहे...यामध्ये काँग्रेसच्या एक गट सुद्धा आमच्याशी संवाद करत आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क केला आहे. पहिल्या फेरीची चर्चा त्यांच्याशी झालेली आहे.
किती लोक संपर्कात आहेत असं विचारलं असता सुधीर मुनगंटीवारांनी उत्तर देणं टाळलं आहे. सर्व गोष्टी सांगितल्या जात नाहीत. काही गोष्टींमध्ये गुप्तता ठेवावी लागते. सगळं सांगितलं तर बाकी लोक सावध होतील, असंही मुनगंटीवार म्हणाले.
