शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याचे ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे या दसरा मेळाव्यातून राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आपल्या पक्षाच्या आगामी वाटचालीचे संकेत देत असे. सलग 40 वर्ष एक नेता, एक मैदान असा विक्रमही शिवसेनेच्या नावावर आहे. शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा त्यासाठी महत्त्वाचा असतो. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. शिवसेनेतील फुटीनंतर छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर कोणाचा दसरा मेळावा होणार, याचा वाद रंगला होता. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने दावा केला होता. दोन्ही बाजूने मोठा वादही चांगलाच रंगला होता. त्यानंतर हे मैदान ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देण्यात आले. त्यानंतर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदान आणि त्यानंतर आझाद मैदानात पार पडला.
advertisement
यंदाचा दसरा मेळावा कोणाचा?
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार का याची उत्सुकता कायम असताना हे मैदानाबाबतची अपडेट समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जानेवारी 2025 मध्ये दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी यंदाही शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जानेवारी महिन्यात अर्ज केल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाकडून जवळपास तीन वेळा परवानगीबाबत स्मरण पत्र देखील पालिकेला देण्यात आलं आहे. मात्र, महापालिकेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, दसरा मेळाव्याला लवकरच परवानगी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून घुमणार असल्याची अधिक शक्यता आहे.