प्रल्हाद रामकिशन बनसोडे असं मृत ठरवलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. ते गंगापूर येथील रहिवासी असून ते एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लिव्हरच्या त्रासामुळे लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागील तीन दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतरही ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी प्रल्हाद यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले.
advertisement
नातेवाईकांनी त्यांना घेऊन गावी परतत असताना, व्हॉट्सॲपवर त्यांच्या निधनाचा मेसेज टाकला. यामुळे गावात शोककळा पसरली आणि श्रद्धांजलीचे मेसेजही आले. मात्र, घरी पोहोचल्यावर अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना त्यांना अखेरचं पाणी पाजण्यात आलं. त्यावेळी त्यांनी अचानक डोळे उघडले.
हा प्रकार पाहून नातेवाईकांसह गावकरी हादरले. ज्याच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते, तीच व्यक्ती जिवंत असल्याचं समोर आल्यानंतर शोकाकुल वातावरण आनंदात बदललं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने घटनेची माहिती डॉक्टरांना देण्यात आली. यानंतर लातूरहून डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची तपासणी केली. तपासणीअंती ते जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे, घरात सुरू असलेला शोकाचे वातावरण आनंदाश्रूंनी भरून गेले.