आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप विजय संकल्प मेळाव्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार यांनी केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणूक जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला.
अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का...
यंदा आपला विजय कोणी थांबवू शकत नाही. मागच्या वेळी दोन नगरसेवक कमी पडले. महापौरपद थोडक्यात राहिले पण कमी असले तरी काय करायचे ते आपल्याला माहिती आहे. पण मागच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला जे आपले आता सहकारी आहेत. उद्धव ठाकरे नाराज झाले असून आमचा महापौर करा, अशी त्यांची इच्छा असल्याचे मला एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही सत्तेत न बसता थेट सगळे उद्धव ठाकरे यांच्या हवाली केले. आमच्या हातात असलेले महापौरपद आम्ही त्यावेळच्या शिवसेनेला दिले. आपण मन मोठे दाखवले पण २०१९ ला अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का? यार ने ही लुट लिया घर यार का... या हिंदी गीताचा आधार घेऊन फडणवीस यांनी खंत व्यक्त केली.
advertisement
उद्धव ठाकरे यांनी धोका दिला तरी आम्ही रडत बसलो नाही. आम्ही लढलो, म्हणूनच २०२२ ला गनिमी कावा केला आणि २०२४ ला एकहाती आलो, काहीही झालं तरी मुंबईला महायुतीचाच महापौर मिळेल, असे फडणवीस म्हणाले.
ब्रँडचा बँड वाजला, यंदा काहीही झालं तरी आपलाच महापौर
खरे तर काही लोक स्वतःच हसू करू घेत आहेत. बेस्टच्या निवडणुकीत तुमच्या ब्रँडचा बँड वाजवला आहे. बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाहीत. जगातला सगळ्यांत मोठा ब्रँड आमच्याकडे आहे ते म्हणजे पंतप्रधान मोदी. कुणाचीही युती होऊद्यात, यंदा आपला विजय नक्की आहे, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. काही उचक्के दररोज काहीतरी बोलतात, पण याला उत्तर मुंबईकरांनी यापूर्वीच दिले आहे, असा टोलाही फडणवीस यांनी राऊत यांना लगावला.
उद्धव ठाकरेंचे विकासावर एक भाषण दाखवा, १०० रुपये बक्षीस देतो
उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा, मुंबईकरांच्या जीवनात काय विकास करणार याबद्दल एक शब्द नाही, त्यांचे विकासावर एक वाक्य दाखवले तर मी १०० रूपये देईन, असे उपहासाने फडणवीस म्हणाले. प्रतिस्पर्ध्यांना निवडणुकीत पाणी पाजायचे आहे, असेही ते म्हणाले.