धाराशिव: राज्यात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात अनोख्या पद्धतीनं कोजागिरी उत्सव साजरा केला जातो. श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. घराघरातून मंदिरात दूध गोळा केलं जातं. सर्वजण एकत्र येत मसाला दूध बनवतात आणि चंद्रोदयानंतर प्रसाद म्हणून हे दूध वाटलं जातं. गेल्या 35 वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.
advertisement
कोजागिरी पौर्णिमेला दुधामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहून ते दूध पिण्याची मान्यता आहे. उमरगा येथील दत्त मंदिरात शेकडो भाविक एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. एवढंच नाहीतर यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्वजण एकत्र येत भजन करतात. त्यानंतर दुधाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात.
दरम्यान, गेल्या 35 वर्षांपासून श्री दत्त मंडळाकडून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून शेकडो भाविक एकत्र जमतात. त्यामुळे उमरगा येथील कोजागिरीच्या या अनोख्या परंपरेची चर्चा होतेय.