महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तिन्ही पक्षातील – शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी – आमदारांना समसमान निधी देण्याच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
महायुती सरकारच्या अंतर्गत निधीवाटपावरून अनेक आमदारांनी सार्वजनिक आणि खासगीरित्या नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः छोट्या मतदारसंघांतील आमदारांना अपेक्षित निधी मिळत नसल्याने नाराजी वाढली आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता शिवसेनेतील मंत्र्यांनी अंतर्गत बैठक घेत तिन्ही पक्षांमध्ये समसमान निधी वितरणाच्या धोरणावर चर्चा केली.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रस्ताव लवकरच महायुतीतील समन्वय समिती किंवा तीनही पक्षांचे प्रमुख नेते यांच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय त्या माध्यमातून घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निधीच्या मुद्द्यावरून मंगळवारी भाजप आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पूरम यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची वाट अडवत सहाय्य निधीच्या गैरवाटपाचा जाब विचारला, ही घटना विधान भवनाच्या परिसरात घडली. त्यामुळे मंत्र्यांवर थेट दबाव वाढत असल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर, अधिवेशनाच्या कालावधीतच महायुतीतील समन्वय समितीची किंवा थेट तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निधीवाटपाच्या मुद्द्यावरून होणारे वाद रोखण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.