जे आडवे येतील त्यांना आडवे करून पुढे जाऊ अशा शब्दात मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला. त्यांचा बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता यावरून सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते ठाण्यात बोलत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. गणेश नाईक स्वत: जातीनं लक्ष घालत आहेत. कधी त्यांच्या नावाचे बॅनर ठाण्यात झळकतात तर कधी गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवतात. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढणार की स्वबळाचा नारा देत शिवसेना भाजप आमने सामने उभे ठाकणार याचीही चर्चा ठाण्यात सुरू आहे.
advertisement
राज्याचे उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्व राज्याला परिचित आहे. महापालिका निवडणुकीआधी शिंदे-नाईक यांच्यातील वाद उफाळून आला आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर तीव्र हल्ले होत आहेत.
ठाणे जिल्ह्याचा खरा रावण कोण आहे याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. त्या रावणाला अहंकार आल्यानेच त्यांची ही परिस्थिती झाली आहे. रावणाचे जसे अहंकारामुळे दहन झाले होते. तशीच परिस्थिती यांनी झाली होती. मात्र लोकांनी त्यांना परत सुधारण्याची संधी दिलीय, तर त्यांनी सुधारावे, असे प्रत्युत्तर उपनेते विजय चौगुले यांनी दिले आहे. नवी मुंबईतील जनता त्यांच्या अहंकाराचे दहन करेल येत्या काळात ठाणे जिल्ह्याचा रावण कोण आणि राम कोण हे आम्ही दाखवून देऊ, असे उपनेते विजय चौगुले यांनी म्हटले.