दिवाळीच्या तोंडावर करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
एसटी महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
advertisement
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय निर्णय घेतला होता?
एसटी महामंडळाने दिवाळी सणाच्या तोंडावर १० टक्के भाडे वाढीचा निर्णय घेतला होता. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडे वाढ लागू होणार होती. वातानुकूलित आणि शिवाई बस सेवा वगळता सर्व बस सेवांसाठी हा निर्णय लागू असेल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले होते. १४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून आणि त्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराने तिकीट आकारणी करावयाच्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, अशा प्रवाशांकडून त्या आरक्षण तिकिटाचा जुना तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक वाहकाने वसूल करावयाच्या सूचना देखी महामंडळाने दिलेल्या होत्या. थोडक्यात १५ ऑक्टोबर, २०२५ च्या रात्री १२ पासून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांकडून सुधारित भाडेदराने भाडे आकारणी करावयाची आहेत, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले होते.
तसेच दिवाळी गर्दीचा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच दिनांक ०६.११.२०२५ पासून पुन्हा मूळ प्रति टप्पा दराने म्हणजेच दिनांक २५.०१.२०२५ पासून लागू असलेल्या दराने भाडे आकारणी करण्यात यावी, असेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले होते.