माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अतिशय मनाला चटका लावणारी आजची दुर्दैवी घटना आहे. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड आणि स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली पकड संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होते. रोखठोक बोलणारे असले तरी अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी घेतला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
advertisement
त्यांनी पुढे म्हटले की, मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होते तेव्हा लाडकी बहीण योजना इतर योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक तरतूद उत्कृष्टपणे त्यावेळी केली होती याचा अनुभव मला आहे. एकदा करायचं ठरवलं की ते करायचे, करतो बघतो पाहातो असं त्यांचं कधीही नसायचं, आम्ही टीम म्हणून काम केलं. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आहेत. अजित दादा पहाटे लवकर काम करायचे. अतिशय महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला असल्याचे त्यांनी म्हटले.
माझा मोठा भाऊ हरपला...
एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, माझ्यापेक्षा ते राजकारणातील अनुभवती नेते, राजकारण, वयाने सगळ्याच बाबतीत मोठे होते. राजकारणातील अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्याचा फायदा मंत्रिमंडळात व्हायचा. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचं नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन येणारं नुकसान झालं आहे. माझ्या पेक्षा वयानं मोठे असल्यामुळे जी काही आमची जवळीक निर्माण झाली होती, राजकारणातले आम्ही एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ म्हणून माझ्यासाठी अजितदादा होते. आज मोठा भाऊ हरपल्याची भावना असून त्याचं दु:ख माझ्या मनात असल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
