विरोधी पक्षाचे आमदार निधी मिळत नाही म्हणून ओरडत असतानाच, माजी आमदार असलेल्या सदा सरवणकरांना तब्बल 20 कोटी रुपये मिळाले, जिथे विद्यमान आमदारांना 2 कोटी मिळतात. त्यांच्या याच दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला. यावर आता त्यांनी स्पष्टीकरण देताना नेहमीप्रमाणे वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे सांगितले.
मी तसे म्हणालोच नव्हतो
एका कार्यक्रमाला गेल्यानंतर आयोजकांनी काही मागणी केली असता मला केवळ दोन कोटी मिळतात, असे विद्यमान आमदार महेश सावंत म्हणाले. त्यावर मला २०२४-२०२५ ला २० कोटी निधी मिळाला होता, असे मी म्हणालो होतो. मला दरवर्षी २० कोटी मिळतात, असे मी म्हणालोच नव्हतो, असे स्पष्टीकरण सरवणकर यांनी दिले.
advertisement
महेश सावंत यांनी बिल्डरांच्या ऑफिसात जायचे सोडून लोकांमध्ये जावे
मी २०२२-२४ पर्यंतच्या निधीतून आजही काम करत आहे. स्थानिक आमदारांनी विभागात फिरावे, काम करावे. हे करायचे सोडून माझे बोर्ड तोडत ते फिरत आहेत. बिल्डरांच्या ऑफिसात जायचे सोडून त्यांनी लोकांमध्ये जावे, असा टोला सरवणकर यांनी महेश सावंत यांना लगावला. लोकांची कामे करण्यासाठी आमदार असणे गरजेचे नाही. मी ४० वर्ष अविरत काम करत आहे आणि पुढेही करेल, असेही ते म्हणाले.
सिद्धिविनायक कमानीला सरकारने निधी दिला
सिद्धिविनायक कमानीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी आमदार सावंत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "हा सगळा बालिशपणा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक वेळी निधी दिला आहे. एक कोटीमध्ये कमान होणार आहे"