ठाकरेंच्या मतपेढीवर लक्ष...
शिवसेनेत फूट पडूनही ठाकरेंचा मतदार त्यांच्यासोबत राहिल्याचे दिसून आले. मुंबईतील मराठी मतदार अजूनही ठाकरेंसोबत आहे. हा मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर कोकणातील मतदार आहे. आता हाच मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाने रणनीती आखली आहे. मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिळणारी संधी साधण्याचे नियोजन शिंदे गटाने केले आहे.
advertisement
गणेशोत्सवानिमित्ताने विशेष बससेवा...
गणपतीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो कोकणवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष एसटी सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मुंबईतील शिवसेना आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीत गणपतीसाठी कोकणातील गावी जाणाऱ्या मुंबईतील कोकणवासियांची प्रचंड संख्या लक्षात घेता, प्रत्येक शिवसेना शाखेतून 3 ते 4 एसटी बस सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, गरज भासल्यास "विशेष एक्सप्रेस सेवा" सुरू करण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे.
दरवर्षी कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि एसटी सेवा अपुरी पडते, त्यामुळे चाकरमाण्यांची मोठी तारांबळ होते. शिवसेना शिंदे गटामुळे यंदा काही प्रमाणात ही अडचण कमी होण्याची शक्यता आहे.
कोकणवासियांना साद...
गणपतीसारख्या भावनिक आणि पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांची मने जिंकण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांनाही लक्षात घेऊन शिवसेनेकडून विविध उपक्रमांची मालिका राबवली जाणार असल्याची माहितीही या बैठकीनंतर समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचा हा उपक्रम राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरू शकतो.