राज्यात महायुतीतील एकजुटीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं (अजित पवार गट) घड्याळ हाती बांधलं आहे. मात्र, या पक्षप्रवेशावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून थेट युतीधर्मावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
advertisement
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेना शिंदे गटाची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केले आहे. ज्यांच्या छाताड्यावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला आहे. त्यांना पक्षात घेताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एकनाथ शिंदे यांना विचारात घेणे अपेक्षित होते असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावरूनच गुलाबराव पाटलांनी युतीधर्मावर प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात ही मोठी खळबळ उडाली आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याची मुभा आहे त्यामुळे आम्ही देखील त्याचा भविष्यात विचार करू असा सूचक इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला.
म्हणून अजितदादांकडे देवकर आले...
गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, गुलाबराव देवकर यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आता हाच भ्रष्टाचार मिटवण्यासाठीच त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्या तरी जळगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
