एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील घरातून पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शिंदेंसोबत त्यांच्या निवासस्थानी प्रताप सरनाईक, संजय शिरसाट यासह अनेक नेते उपस्थित आहेत. शिंदेंनी यावेळी सुरूवातीला महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. महायुतीचा हा मोठा विजय आहे. त्यामुळे महायुतीवर लोकांनी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे शिंदे यांनी म्हटले.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणून कशी काम केली याचा लेखाजोखा मांडण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. महाराष्ट्रात अनेक प्रकल्प सुरू आहेत. विकासाची सांगड घातली जात आहे. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून काम केले. अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी खुश आहे. मोदी आणि अमित शहांचे पाठबळ होते.त्यांनी पूर्ण ताकतीने माझा वर विश्वास ठेवला. मला ते दिवस आठवत आहे. समविचारी सरकार असते तेव्हा राज्याच्या प्रगतिचा वेग असतो,असे शिंदे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री पदाच घोडं कुठेही अडलेलं नाही. आणि मी कुठेही ताणून ठेवणारा नाही आहे.तसेच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. माझ्या भावना मी त्यांना सांगितल्या आहेत. तसेच सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीची अडचण होणार नाही. आणि मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे.
दरम्यान आज कोणतीही कोंडी राहू नये यासाठी मी पत्रकार परिषद घेत आहे. आम्ही नाराज होऊन बसणारे लोक नाही लढणारे लोक आहेत. जीव तोडून आम्ही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करणार आहे.त्यामुळे महायुती मधील कोणीही मुख्यमंत्री बनवेल त्यांना शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना मान्य असेल,असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
एकंदरीत शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची मुख्यमंत्रीपदावरून माघार घ्यायची घोषणा केली नाही आहे. याउलट त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपण गेल्या अडीच वर्षात कशाप्रकारे काम केले याचा लेखा जोखाच मांडला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरू शिंदेंचा दावा अजूनही कायम आहे.त्यामुळे शिंदेंनी एकप्रकारे ही पत्रकार परिषद घेऊन दिल्लीतील नेत्यांना आपण माघार घेत नसून आपला दावा कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे शिंदेंनी आता थेट चेंडू मोदी-शाहांच्या कोर्टात टाकला आहे. आता मोदी-शाह काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
