शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी फूट पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठं आव्हान दिले. महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपच्या सोबतीने युतीची सत्ता आणली. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. या दरम्यानच, एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबईकडे लक्ष दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी थोडं, थोडं करत ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत. मुंबईत ठाकरेंना बंडाचा फटका बसणार नाही असे म्हटले जात होते. मात्र, शिंदे यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. शिंदे यांनी ठाकरेंचे अनेक महत्त्वाचे नगरसेवक गळाला लावले.
advertisement
2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काय झालं?
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकूण 84 जागांवर विजय मिळवत बाजी मारली होती. त्यानंतर चार अपक्ष नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. काही महिन्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले. पुढे जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीनंतर आणखी पाच नगरसेवकांची भर पडत, एकूण आकडा 99 वर पोहोचला. याचाच अर्थ, निवडणुकीनंतरच्या काळात शिवसेनेने 15 नगरसेवकांची वाढ करून आपलं बळ अधिक भक्कम केलं होतं. 2017 ते 2022 या काळात शिवसेनेचा मुंबई महानगरपालिका वरील मजबूत पकड कायम राहिली.
पक्ष फुटीनंतर ठाकरेंसमोर मोठं आव्हान...
मात्र 2022 नंतरचा कालखंड शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरला. पक्षात पडलेल्या फुटीनंतर 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येही मोठी फूट पडली. एकामागून एक नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत गेले. ठाकरे गटाकडे असलेले एकूण 99 पैकी 44 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. तर उर्वरित 55 माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठाकरेंचे आणखी काही नगरसेवक शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचं संख्याबळ
2017 विजयी नगरसेवक – 84
अपक्षांचा प्रवेश – 4
मनसेतील नगरसेवकांचा प्रवेश – 6
पोटनिवडणुकीद्वारे वाढ – 5
एकूण संख्याबळ (2022 पर्यंत) – 99
शिवसेना फुटीनंतरचे चित्र:
उद्धव ठाकरे गट – 55
शिंदे गट – 44