ठाण्यात शनिवारी रात्री, दिवाळीनिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ठाणे महापालिकेत सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनीदेखील एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडले होते. त्याशिवाय, ठाकरे गटाकडूनही शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, काहीजण लवंगी फटाके फोडून गेले आहेत. त्यांचा हिशोब मी घेणार आहे. आपला एकच अॅटम बॉम्ब हा विरोधकांचा सुपडा साफ करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मी माणसं कितीतरी कमावली आणि त्याचं प्रेम मिळवलं असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
आज दिवाळीचा एकीकडे आनंद आहे. राज्यातील पूर परिस्थिती आहे. शिवसेना संकटात धावून जाते. आपले लोक बांधावर गेले. दसरा मेळाव्याला पूरपरिस्थिती लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. हजारो लाखो शेतकरी बांधवांचे नुकसान झालं. त्यांना इथून किट पाठवण्यात आले. सरकारनेही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आपत्ती तिथे शिवसेना अन् संकट तिथे एकनाथ शिंदे असे त्यांनी नमूद केले.