आमदार नीलेश राणे यांनी मालवणमधील भाजप पदाधिऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी संबंधित भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर भाजपकडून नीलेश राणे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. कुणाच्या घरात घुसण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे विचारीत मालवणमध्ये पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर नीलेश राणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
advertisement
असले प्रकार आयोगाच्या नियमात बसत नाही, नीलेश राणेंना झटका
निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणात निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करीत कुणाच्याही घरात जाणे आणि फेसबुक लाईव्ह करणे आणि कारवाईची मागणी करणे हे आयोगाच्या नियमात बसणारी बाब नसल्याचे सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल परंतु कुणाच्या घरात जाऊन व्हिडीओ काढणे आणि कारवाईची मागणी करणे हे अधिकारांत बसत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना आयोगाच्या नियमांसंबंधित स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली
निवडणूक आयोगाने निलेश राणे प्रकरणात संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून देखील माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेने भाजपविरोधात लढत असलेल्या नीलेश राणे यांना जोरदार झटका बसला आहे.
