माजी आमदार नारायण मुंडे यांनी रविवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील मृत डॉक्टरच्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणी पीडित कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर माजी आमदार नारायण मुंडे यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.
ऊसतोड मजुराच्या वाघिणीची लांडग्याने शिकार केली
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, ऊसतोड मजुराच्या वाघिणीची लांडग्याने शिकार केली. उद्या दिवसभर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. शासनाने या प्रकरणाला योग्य पद्धतीने हाताळले नाही तर मी बीड ते फलटण पायी 83 वर्षाचा माणूस पायी काठीच्या आधारावर जाणार आहे, असे सांगत नारायण मुंडे यांनी ऊसतोड मजुराच्या लेकीसाठी टोकाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
मी आता शासनाला स्वस्थ बसू देणार नाही- धनंजय मुंडे
महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास जे पोलीस अधिकारी करीत आहेत किंबहुना ज्यांनी आत्महत्येनंतर तपास केला या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्ड काढण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. खासदाराच्या दोन पीएचा संबंध जोडला गेला आहे, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. महिला डॉक्टरच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी आता शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री साहेब आमच्या पोटचा गोळा गेला आहे
मुख्यमंत्री म्हणाले की डॉक्टर मृत्यू प्रकरणात राजकारण करू नका. मला त्यांना सांगायचंय की आमचा पोटचा गोळा गेला आहे. राजकारण करू नका असे कसे म्हणू शकता. सरकार म्हणून तुम्ही दोषींची चौकशी करून न्याय देण्याची भूमिका घ्या, असे नारायण मुंडे म्हणाले.
आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करा, सुरेश धस यांची मागणी
सातारा महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात पोलीस तपासावर अविश्वास व्यक्त करत भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून चौकशी करा आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
