मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस मुंबईहून मालवणच्या दिशेनं जात होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही बस रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ आली असता, बसने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच बस चालकाने तातडीने बस रस्त्याच्या बाजुला घेतली आणि प्रवाशांना खाली उतरवलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. मात्र गणेशभक्तांचं सर्व सामान जळून खाक झालं आहे.
advertisement
बसला आग लागल्याची ही घटना समजताच खेड महापालिकेचं अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. तसेच प्रवाशांना पर्यायी वाहन उपलब्ध करून त्यांना आपापल्या गावी पाठवलं आहे. बसला ही आग नेमकी कशामुळे लागली याचं ठोस कारण अद्याप समोर आलं नाही.
मात्र ही बस मुंबईहून मालवणच्या दिशेनं जात असताना बसचे चाक गरम झाले. आणि बसने अचानक पेट घेतल्याचं सांगितलं जातंय. बसला आग लागण्याच्या कारणाचा शोध घेतला जातोय. पण गणपती सणाच्या तोंडावर मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे गणेशभक्तांनी सुटकेचा निश्वास सोडला.