गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोलापूर जिल्ह्याला देखील या पावसाचा फटका बसला आहे. सीना नदीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता. अशातच धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सीना नदी पात्र सोडून वाहू लागली. या पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हराळवाडी गावातील घोडके वस्तीतील ग्रामस्थांना स्थलांतर करावं लागलं आहे.
advertisement
मात्र, अद्याप प्रशासनाने या ग्रामस्थांची राहण्याची सोय केलेली नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरच चूल मांडून राहावं लागत आहे. पुराचं पाणी घरात शिरल्याने घरातील सर्व साहित्य घरामध्ये ठेवून नागरिक घरातून बाहेर पडले आहेत. प्रशासनाचे लोक येऊन फक्त जात असून राहण्याची सोय केली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मागच्या वर्षी आलेल्या पुरामुळे देखील सर्व साहित्य वाहून गेलं होते. तेव्हासुद्धा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मदत केली नव्हती. सध्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जीवनावश्यक वस्तू घेऊन महिला आपल्या लहान लेकरांसह रस्त्यावरच राहत आहेत. घोडके वस्तीत राहणाऱ्या पार्वती घोडके यांचं किराण दुकान असून दुकानातील सर्व साहित्य, घरामधील साहित्य, पाण्याची टाकी डोळ्यासमोरून वाहून गेलं. प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी घोडके वस्तीतील महिलांनी केली आहे.