पुण्यातील शुक्रवार पेठ हे हलव्याचे दागिने खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला कमी किंमतीत आणि विविध प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध असल्याने ग्राहकांची विशेष पसंती या बाजाराला मिळत आहे. शुक्रवार पेठेतील आईजी सेल्स हे दुकान गेली दहा वर्षे ग्राहकांच्या सेवेत असून येथे चार ते पाच प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्वांसाठी योग्य असे दागिने येथे पाहायला मिळतात. या दुकानात मंगळसूत्र, कानातले, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या, बिंदी, हार असे विविध प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत.
advertisement
हे हलव्याचे दागिने पारंपरिक पद्धतीने ओवलेले असून सणासाठी खास तयार करण्यात येतात. याशिवाय दागिन्यांसोबत वाण देण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही येथे उपलब्ध आहेत. सजावटीसाठी हँगिंग डेकोरेशन, घरातील सजावटीचे साहित्य आणि विविध डेकोरेशन आयटम्सही ग्राहकांना येथे मिळतात. विशेष म्हणजे, या हलव्याच्या दागिन्यांचे सेट या दुकानामध्ये केवळ 100 रुपयांपासूनच उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात सणाची तयारी तुम्हाला करता येणार आहे. वेगवेगळ्या डिझाइन आणि व्हरायटीमुळे महिलांना आपल्या पसंतीनुसार दागिने निवडता येत आहेत.
मकरसंक्रांत सण जवळ आल्याने शुक्रवार पेठेतील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. स्वस्त दरात आणि चांगल्या दर्जाचे हलव्याचे दागिने उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे,अशी माहिती व्यावसायिका ममता चौधरी यांनी दिली. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शुक्रवार पेठ सध्या संक्रांतीच्या रंगात रंगून गेली असून, हलव्याच्या दागिन्यांनी बाजारपेठ अधिकच खुलून दिसत आहे.