अजितदादांना दोनदा धक्का
युगेंद्र पवारांआधी अजितदादांच्या कुटुंबामध्येच दोन जणांना पराभवाचा धक्का बसला होता. काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पराभव पत्करावा लागला होता.
सुनेत्रा पवारांआधी अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढवली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवत होते, पण शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांना धक्का दिला होता.
advertisement
शरद पवारांचा एका मताने पराभव
राजकारणाच्या आखाड्यातले चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या शरद पवारांनाही निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला होता. शरद पवारांना फक्त एका मताने निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं होतं. शरद पवारांचा हा पराभव ते केंद्रीय मंत्री असताना झाला होता. 2004 साली जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयमध्ये निवडणूक होती, तेव्हा शरद पवार आणि रणबीर सिंह महेंद्र समोरासमोर होते. रणबीर सिंह यांना जगमोहन दालमिया यांचा पाठिंबा होता. जगमोहन दालमिया पडद्याआडून रणनीती आखत होते. या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा अनेकांना धक्का बसला, कारण राजकारणाचे चाणक्य असलेल्या शरद पवारांचा एका मताने पराभव झाला होता.
2004 साली बीसीसीआयच्या निवडणुकीत शरद पवार आणि रणबीर यांना 15-15 अशी बरोबरीची मतं मिळाली होती. पण अध्यक्ष म्हणून दोन टर्मचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जगमोहन दालमिया यांनी त्यांचं मत रणबीर सिंह महेंद्र यांच्या पारड्यात टाकलं, त्यामुळे शरद पवारांचा पराभव निश्चित झाला.
एका वर्षानंतर पवार अध्यक्ष
2004 साली पराभव झाल्यानंतर एका वर्षात म्हणजेच 2005 साली शरद पवार निवडणूक जिंकून बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आणि 2008 पर्यंत त्यांनी दोन टर्म अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. यानंतर 2010 ते 2012 पर्यंत शरद पवार आयसीसीचे अध्यक्षही होते.
