नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जिल्हा संघटनेत मोठा फेरबदल करत राजेश पाटील यांची नवी मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयाने दोन दशकांपासून शहराच्या राजकारणावर पकड असलेल्या गणेश नाईक यांचे आता त्यांच्याच होम ग्राउंडवर राजकीय वजन कमी करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंदा म्हात्रे यांना बळ...
advertisement
राजेश पाटील हे बेलापूरमधील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मंदा म्हात्रे यांनी या निवडीवर आनंद व्यक्त करताना पक्षाला अधिक संघटनात्मक बळकटी मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. तर, दुसरीकडे गणेश नाईक यांच्या समर्थकांनी भाजपचे नेते आणि गणेश नाईक यांच्यात चर्चा झाली असावी आणि त्यानंतरच निर्णय घेतला गेला असल्याचे म्हटले आहे. गणेश नाईक यांचे पुतणे आणि नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक हे देखील जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते, अशी चर्चा आहे.
नाईकांचे पंख छाटले, आता तिकिट वाटपापासूनही दूर?
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश नाईक आणि त्यांचा मुलगा, आमदार संदीप नाईक यांनी 2024 पर्यंत संघटनेची सूत्रे घट्ट पेलून धरली होती. मात्र जुलै 2023 मध्ये संदीप नाईक यांची जिल्हाध्यक्षपदी नेमणूक अल्पकाळच टिकली. आता राजेश पाटील समोर आल्यानंतर नाईक कुटुंबीयांची निर्णयक्षमता आणखी मर्यादित झाली आहे. संदीप नाईक यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या सोबत गेलेले बहुतांशी नगरसेवकांनी गणेश नाईकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशाबाबत विरोध सुरू असल्याची चर्चा आहे. आता, मंदा म्हात्रे यांना भाजपने बळ दिल्याने नवी मुंबई महापालिकेच्या तिकीट वाटपात गणेश नाईकांचा हस्तक्षेप फारच कमी राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
