ठाणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभाग रचनेवरून महायुतीमध्येच धुसफूस सुरू असताना दुसरीकडे काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटामध्येही कुरघोडीचं राजकारण रंगू लागलं आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात घेरण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. गणेश नाईक यांनी जनता दरबार घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाईकांनी कार्यकर्त्यांशी बोलताना अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्यावरच वार केला असल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. "ठाण्यात सत्ता मिळवायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करणे अपरिहार्य आहे," अशा शब्दांत त्यांनी थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गणेश नाईक यांची ही टीका थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी असल्याचे म्हटले जात आहे.
भाजप कार्यालयात नुकतीच पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या वेळी बोलताना नाईक यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला. "नवी मुंबईत मी भाजपला सत्ता मिळवून दिली. त्याचप्रमाणे ठाण्यातही सत्ता आणू शकतो. मात्र त्यासाठी रावणाच्या अहंकाराचा अंत करावा लागेल," असे त्यांनी स्पष्ट केले.
...तर, युतीला मीच विरोध करणार
युतीच्या संदर्भातही नाईक यांनी ठाम भूमिका मांडली. "जर पक्षाच्या वरिष्ठांनी ठाण्यात युतीवर भर दिला आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला नाही, तर या युतीला पहिला विरोध करणारा मीच असेन," अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत घेतली. नाईक यांच्या या इशाऱ्यामुळे ठाण्यात भाजप आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
प्रभाग रचनेवरूनही नाराजी...
ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीसोबत भाजपमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. ठाणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना ही शिवसेना शिंदे गटाने आपल्या सोयीनुसार केल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. त्यानंतर आता गणेश नाईक यांच्या वक्तव्याने ठाणे महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.