जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना गिरीश महाजन यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले असल्याचे दिसून आले. त्याशिवाय, त्यांनी एकनाथ खडसे, संजय राऊत आणि इतर नेत्यांवर ही नाव न घेता टीका केली.
मनातली खदखद बाहेर...
गिरीश महाजन यांनी कार्यशाळेत बोलताना सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे बरे झाले. मागील अडीच वर्षांचा काळ भाजपसाठी खूप वाईट होता', अशी खदखद मंत्री महाजन यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून संघर्ष होण्याची स्थिती असल्याचे दिसून येत आहे. भाजपने ठाण्यातच एकनाथ शिंदेंना घेरले आहे. आता जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी मेळाव्यात अडीच वर्षाची खदखद बाहेर काढली. यातून भाजपला आता शिवसेना शिंदे गटासोबत स्थानिक निवडणुकीत आघाडी नको, असे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
इतर विरोधकांवरही महाजनांचा निशाणा...
मंत्री गिरीश महाजन यांनी मेळाव्यात विरोधकांवर निशाणा साधताना, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा थेट उल्लेख टाळला. मात्र, अप्रत्यक्षपणे त्यांनी तिघांवरही जोरदार हल्लाबोल केला.
महाजन म्हणाले, "कोणी काही बोलत असेल, तर त्याकडे लक्ष देऊ नका. बडबड करणाऱ्यांची अवस्था काय आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यांच्या वक्तव्यांकडे कुणी लक्ष देत नाही म्हणूनच ते अशा प्रकारे बोलत राहतात." त्यांनी असा टोला लगावला की, "हे नेते चर्चेत राहण्यासाठी केवळ इतरांविषयी बोलतात. त्यांना प्रसिद्धी मिळते ती फक्त आमच्या नावावरूनच."
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाजन यांनी स्पष्ट केलं की, "आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं. कोण काय बोलतंय याला महत्त्व न देता मार्गावर टिकून राहायचं." असंही त्यांनी म्हटले.