प्रख्यात समाजसुधारक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मरणार्थ या ऐतिहासिक वास्तूला 'गोखले हॉल' हे नाव देण्यात आलं आहे. 1911 साली अॅनी बेझंट यांनी या हॉलची स्थापना केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे ठिकाण राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींचे केंद्र बनलं होतं. त्या काळात देशभरात स्वातंत्र्यलढ्याचं वार भरलेलं असताना या हॉलमध्ये अनेक महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक क्रांतिकारक आणि नेत्यांनी येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी रणनिती आखली होती.
advertisement
भर रस्त्यात गोळीबार आणि फाशी, प्रसिद्ध चौक आहे धगधगत्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार
त्या काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवणे अतिशय धोकादायक होते. तरीही या हॉलमध्ये सत्याग्रह, स्वदेशी चळवळ, बहिष्कार यांसारख्या स्वातंत्र्यलढ्याशी निगडित विषयांवर चर्चा व्हायची. याशिवाय शिक्षणातील सुधारणा, सामाजिक प्रश्न आणि संघटनात्मक कामांवर देखील विचारमंथन होत असे. या जागेवरूनच स्वातंत्र्याची ठिणगी पसरली आणि हजारो लोक त्या लढ्यात सामील झाले.
सध्या गोखले हॉलमध्ये एक स्थायी संग्रहालय आणि इतिहासाची माहिती देणारी गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. यामुळे हे ठिकाण केवळ भूतकाळाची आठवण न राहता, पुढील पिढ्यांसाठी देशप्रेमाची प्रेरणा देणारं केंद्र ठरत आहे. पुणे हे आधीपासूनच राष्ट्रवाद, समाजसुधारणांचे केंद्र राहिलं आहे आणि गोखले हॉल ही त्या वारशाची ओळख आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन करणे, ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कारण, या वास्तू दगड-मातीच्या नसून आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत.
इतिहासकार संजय सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काळात जहाल गट आणि मवाळ गट असे दोन मतप्रवाह होते. गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळ गटाचे प्रमुख नेते होते. ते गणितातील प्रावीण्यामुळे ओळखले जात होते. त्यांचं 'अंकगणित' हे पुस्तक अभ्यासक्रमात होतं. त्यांनी 1905 साली 'भारत सेवक समाज' ही संस्था स्थापन केली होती. ही संस्था सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींसाठी महत्त्वाची ठरली. तसेच पुण्यातील 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' ही संस्था देखील त्यांच्या कार्याचीच देणगी आहे.