गेल्या अनेक वर्षांपासून भूकरमापकांना इतर विभागातील कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. या विषमतेविरोधात संघटनांनी अनेकदा आंदोलन, तक्रारी आणि बेमुदत संप सुरू केले होते. जुलै महिन्यात पुणे विभागातील भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या संपादरम्यान डॉ. दिवसे यांनी मध्यस्थी करत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर पुणे, नाशिक, कोकण, विदर्भ, छत्रपती संभाजीनगर या विभागातील विविध संघटना तसेच कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यापक बैठक घेण्यात आली. बैठकीला अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे, उपसंचालक राजेंद्र गोळे, कमलाकर हट्टेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
advertisement
वेतनश्रेणीत मोठी वाढ
सध्याची भूकरमापकांची ‘एस-6’ वेतनश्रेणी बदलून ‘एस-8’ करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे बेसिक वेतन 19 हजारांवरून थेट 25 हजार 200 रुपयांपर्यंत वाढणार आहे. हा बदल महिनाभरात अंमलात येईल, असे संकेत बैठकीत देण्यात आले.
या निर्णयामुळे हजारो भूकरमापकांना दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारकडून तातडीने अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.