महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 27 ऑगस्टपासून 28 ऑगस्टपर्यंत राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस होणार आहे. 29 ऑगस्टलाही काही भागांत पावसाची तीव्रता कायम राहील. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना जपून द्या!
advertisement
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी व कोकण घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रायगड, पालघर, ठाणे काही भागांत जोरदार पाऊस, 30-40 किमी वेगाने वारे वाहतील त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावरील भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत भूस्खलनाचा धोका असल्याने प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, वर्धा, यवतमाळ यांसह अनेक जिल्ह्यांत 27 ते 29 ऑगस्टदरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज आहे. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यात मुसळधार तर नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील घाटमाथा भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.