कशी घडली घटना?
मारोती नेमाने हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील रहिवासी असून हिंगोली एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी सहा वाजता ते मानव विकासची बस घेऊन सेनगाव धानोराला गेले. बस परत घेऊन येताना सेनगाव हिंगोली मार्गावर रिधोरा गावाजवळ छातीत तीव्र वेदना व्हायला लागल्या. त्यांनी प्रसंगावधान राखत व बसमधील प्रवाशांची काळजी करत बसचा वेग कमी करून बस रस्त्याकडेला थांबवली आणि आपले प्राण सोडले. बसच्या वाहकाने तात्काळ एसटी आगाराशी संपर्क केला व मदत मागितली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोहोचत त्यांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून मृत असल्याचे घोषित केले.
advertisement
मारोती नेमाने हे कर्तव्यावर असताना मृत पावल्याने शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून संतुक पिंपरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारोती नेमाने यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले, वृद्ध आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संतुक पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे.
वाचा - शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता
मागच्या वर्षीही अशीच घटना
5 ऑगस्ट 2022 रोजी पुणे-सातारा हायवेवर एसटी बस सुसाट असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मात्र स्वत:चा जीव धोक्यात असताना एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे 25 प्रवाशांचे जीव वाचले आहेत. बसला गती असतानाही त्याने कशीबशी बस बाजूला घेतली. चालकाने त्याच्यासोबत इतका मोठा प्रसंग घडला असतानाही प्रसंगावधान राखलं. बस थांबवल्यानंतर काही वेळातच चालकाचा मृत्यू झाला.
जालिंदर पवार असं 45 वर्षीय चालकाचं नाव आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर चालक जालिंदर पवार यांना चक्कर आली तसेच पुढे हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते.
