अनिल केरबा काळे असं गुन्हा दाखल झालेल्या २२ वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. तो हॉटेल व्यावसायिक आहे. पीडित मुलगी आपल्या घरात टीव्ही बघत असताना आरोपी तिथे आला. त्याने खाऊ देण्याचं आमिष दाखवून तिला बाहेर घेऊन गेला. यानंतर डोंगराच्या पायथ्याला निर्जनस्थळी घेऊन जात त्याने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या भावाचे दुकान जाळले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शिरपूर तालुक्यातील दहिवद गावात घडली. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घरात टीव्ही पाहत होती. टीव्ही पाहून झाल्यावर ती आपल्या वयाच्या काही लहान मुलांमध्ये खेळायला गेली होती. यावेळी नराधम आरोपीची तिच्यावर नजर पडली. त्याने पीडितेला खाऊचे आमिष दाखवून गावाच्या शिवारात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
अत्याचारानंतर आरोपीने पीडित मुलीला घरी आणून सोडले. घरी आल्यावर तिला त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी विचारपूस केली. तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, कुटुंबीयांनी शिरपूर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी अनिल काळे याला अटक केली. या घटनेचे पडसाद शनिवारी उमटले. संतप्त गावकऱ्यांनी एकत्र येत आरोपीच्या भावाचे गावात असलेले दुकान जाळून टाकले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.