संजय राऊत यांनी मुंबईत आज माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, गुरुवारी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत 7 जुलैचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी 6 जुलैचा मोर्चा जाहीर केला. आम्ही मातोश्रीच्या पत्रकार परिषदेत असल्याने त्याची कल्पना नव्हती.
advertisement
राज ठाकरेंचा फोन आला अन्...
मातोश्रीवरील पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यांनी मोर्चाबाबत कल्पना दिली. त्यावर मी त्यांना 7 जुलैच्या मोर्चाची कल्पना दिली. मराठीसाठी एकच मोर्चा असावा अशी भूमिका मांडली. त्यानंतर राज ठाकरे यांचा निरोप घेऊन उद्धव यांच्यासोबत चर्चा केली. त्यावर उद्धव यांनी काही सूचना केली. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे मोर्चावर परिणाम झाला असता. त्यामुळे मोर्चाची तारीख बदलावी अथवा 7 जुलैच्या मोर्चात राज यांनी सहभागी व्हावे, अशी सूचना उद्धव यांनी केली.
उद्धव ठाकरे यांची सूचना राज ठाकरेंना कळवण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून मोर्चाची तारीख बदलली आणि 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आम्ही आता या मोर्चात सहभागी होणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले.