IAS प्रविण पुरी यांना दणका, प्रकरण नेमके काय?
दि मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुलामुलींच्या निवासी कर्मशाळेमध्ये कार्यरत असणारे एकूण २६ कर्मचारी असून गेल्या १०-१५ वर्षापासून कार्यरत आहेत. सर्व कर्मचारी शाळेवरच अवलंबून असून संस्थेने काढलेले कर्ज फेडण्याकरीता संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांना मागणी केली जाते. संस्था अध्यक्ष कर्मचाऱ्यांकडून दरमहा प्रत्येकी एक हजारांची मागणी करतात, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. जर शाळा बंद झाली तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. तसेच संस्था चालकांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना स्वतःची बंदूक काढून धमकवल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. ही तक्रार सभागृहाच्या निदर्शनास आणून देत शाळेवर प्रशासक नेमण्याची विनंती भाजप आमदार संदीप जोशी यांनी केली.
advertisement
संस्था चालकांच्या अघोरी धोरणामुळे शिक्षक आणि कर्मचारी आत्महत्या करतील. हे होऊ नये म्हणून दिव्यांग आयुक्त प्रविण पुरी यांनी लक्ष द्यावी, अशी विनंती आम्ही केली. परंतु आमदारांचे सहा सहा फोन ते उचलत नाहीत. ते प्रतिसाद देत नाही. त्यांच्यावर शासन कारवाई करणार का? असा सवाल आमदार जोशी यांनी केला.
IAS अधिकारी आमदारांचे फोन उचलत नसतील तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाचे काय? दरेकर आक्रमक
आमदार जोशी यांच्या तक्रारीला मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले. मात्र मंत्री सावे यांच्या उत्तरावर भाजप आमदार प्रविण दरेकर यांचे समाधान झाले नाही. त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारून जर आयएएस अधिकारी आमदारांचे फोन घेत नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय होणार, असा सवाल विचारून पुरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
तातडीने सक्तीच्या रजेवर, निलंबनाची कारवाई
अखेर सदस्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन सभापती राम शिंदे यांनी दिव्यांग आयुक्तांना आजच्या आज तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवून सरकारच्या माध्यमातून निलंबित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले.
