शौर्य, बलिदान आणि स्वराज्याच्या संघर्षाचा सिंहगड किल्ला साक्षीदार आहे. हा किल्ला 'कोंढाणा' या नावाने ओळखला जात होता. 1665 मध्ये झालेल्या पुरंदर तहानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून 1670 साली तानाजी मालुसरे यांनी आपल्या मावळ्यांसह सिंहगडावर हल्ला चढवून किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. या लढाईत तानाजींनी वीरमरण पत्करलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दु:ख व्यक्त करत 'गड आला पण सिंह गेला' असे उद्गार काढले होते. त्यांनीच कोंढाण्याला सिंहगड हे नाव दिलं.
advertisement
Pune News : पुणेकरांनो देवीच्या दर्शनाला निघालात? बाहेर पडण्याआधी पाहून घ्या वाहतुकीतील बदल
या किल्ल्यावर फिरताना अनेक ठिकाणी ऐतिहासिक लढाईच्या खुणा पाहायला मिळतात. इतिहासाबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचीही अनेक ठिकाणं किल्ल्यावर पाहायला मिळतात.
द्रोणागिरीचा कडा: या कड्यावरून तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी सिंहगड सर केला होता. बखरींमध्ये या कड्याचा उल्लेख आहे. गिर्यारोहकांना आजही हा कडा पाहताना त्या ऐतिहासिक क्षणांची आठवण येते.
कलावंतीण बुरुज: किल्ल्यावरील प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेला हा बुरुज देखील महत्त्वाचं ठिकाण आहे. या बुरुजातून संपूर्ण परिसराचा नजारा डोळ्यांत साठवता येतो.
हात तुटलेलं ठिकाण: सिंहगडाच्या लढाईदरम्यान तानाजी मालुसरे यांचा हात तुटल्याची आख्यायिका सांगितली जाते. हे ठिकाण पर्यटकांना इतिहासाशी जोडते.
कल्याण दरवाजा: हा गडावर जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. भक्कम तटबंदी आणि शिल्पकलेमुळे हा दरवाजा पर्यटकांना आकर्षित करतो.
झुंजर बुरुज: किल्याच्या संरक्षणासाठी बांधलेला हा बुरुज अतिशय भक्कम आहे. या बुरुजाने आक्रमकांपासून सिंहगडाचं संरक्षण केलेलं आहे.
राजाराम महाराजांची समाधी: छत्रपती राजाराम महाराजांनी याच किल्ल्यावर प्राण सोडले होते. त्यांच्या स्मृतीस्थळामुळे सिंहगडाचे महत्व अधिकच वाढते.
कोंढाणेश्वर मंदिर: शिवभक्तांसाठी हे ठिकाण विशेष महत्त्वाचं आहे. या मंदिरातील शांत वातावरण आणि धार्मिक स्पर्श पर्यटकांना मनःशांती देतो.
सिंहगड हा केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच नाही तर पर्यटनासाठीही लोकप्रिय आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर बघायला मिळणारा निसर्गरम्य नजारा, पावसाळ्यात वाहणारे धबधबे, हिरव्यागार गालिच्याने नटलेले डोंगर आणि माथ्यावर मिळणारे गरमागरम कांदा भजी व दही यामुळे प्रत्येक पर्यटक पुन्हा पुन्हा येथे येण्याची इच्छा बाळगतात. पावसाळ्यात किंवा थंड हवामानात सिंहगडावर फिरताना इतिहास आणि निसर्गाचा मिलाफ अनुभवायला मिळतो. त्यामुळेच सिंहगड हा किल्ला प्रत्येक पुणेकरासाठी आणि इतिहासप्रेमीसाठी कायम आकर्षण ठरतो.