याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपली आई आणि आजीसोबत राहते. फेब्रुवारी महिन्यात एका सामाजिक कार्यक्रमात तिची आणि आरोपी प्रशांतची नातेवाईकाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यांच्यात मोबाइल नंबरची देवाणघेवाण होऊन बोलणं सुरू झालं. काही दिवसांत प्रशांतने तिला प्रपोज केलं. लग्नाचं आमिष देत त्याने तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 14 सप्टेंबर रोजी प्रशांत आणि पीडितेची पुन्हा भेट झाली होती. कुटुंबिय लग्नासाठी नकार देत असल्याचं प्रशांतने पीडितेला सांगितलं. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता.
advertisement
या प्रकारानंतर प्रशांतने तरुणीशी बोलणे बंद केले. तिने अनेकदा त्याचाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आलं नाही. तिने त्याला भेटण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याच्या आईवडिलांनी तिला मारहाण केली. बुधवारी (17 सप्टेंबर) दुपारी तरुणी तणावातच अनवाणी पायाने रस्त्यावरती रडत पळत होती. नागरिक हरिभाऊ हिवाळे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ अन्य नागरिकांच्या मदतीने तिला थांबवत दामिनी पथकाशी संपर्क केला. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या सूचनेवरून सहाय्यक फौजदार लता जाधव अमलदार साक्षी चंद्रे कविता गवळी यांनी तिला ताब्यात घेतलं.
पीडितेला पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये नेलं असता ती 'मला मरायचं आहे, माझं सगळं संपलं' असं म्हणत होती. मात्र, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, सहायक निरीक्षक शिवप्रसाद कन्हाळे, उपनिरीक्षक रेशीम कोळेकर यांनी तिची समजूत घातली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून प्रशांतवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.