नागपूरहून सकाळी कोलकात्याला निघालेल्या इंडिगोचं विमान टेकऑफ केल्यानंतर अचानक मोठा आवाज आला. विमानाला पक्षी धडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तातडीनं विमान पुन्हा नागपूर विमानतळावर परतलं आणि लॅण्डिंग केलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या विमानात 272 प्रवासी होते, जे सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. विमानतळ प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
advertisement
नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, इंडिगोच्या 6E 812 या नागपूर-कोलकाता विमानाला बर्ड हिट झाल्याचा संशय आहे. आम्ही याचे विश्लेषण करत आहोत. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.वैमानिकाने विमानातून यू-टर्न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
दिल्लीला जाणारे स्पाईसजेट विमान तांत्रिक बिघाडामुळे परतले
सोमवारी, पुण्यातून दिल्लीला निघालेल्या स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते उड्डाणानंतर लगेचच पुन्हा पुणे विमानतळावर परतले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पूर्ण आपत्कालीन परिस्थिती जाहीर करून या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. स्पाईसजेटने एका निवेदनात सांगितले की, वैमानिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात परतण्याचा निर्णय घेतला होता.