राज्यात महिलांवरील अत्याचार, वैष्णवी हगवणे प्रकरण, महिला आयोगाची निष्क्रियता आणि इतर मुद्यांवर महाविकास आघाडीतील महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी चर्चा करताना सुषमा अंधारे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का, कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत, कोण आहेत त्या, त्यांच्यावर टीका केली विरोधकांना प्रसिद्धी मिळेल. रुपाली चाकणकर या अंधश्रद्धेत आहेत. त्यांनी या अंधश्रद्धेतून बाहेर पडावं असा टोला अंधारे यांनी लगावला. आजच्या आमच्या राज्यपालांसोबतच्या बैठकीत रुपाली चाकणकर हा विषय अतिशय लहान असल्याचेही अंधारे यांनी म्हटले. लाडकी बहीण योजनेचा निधी, ड्रग्स प्रकरण, वैष्णवी हगवणे प्रकरण, बेपत्ता होणाऱ्या महिलांचे प्रकरण आदींवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
आज राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांकडे आम्ही लाडकी बहीण, ड्रग्ज, हगवणे प्रकरणाबाबत चर्चा केली. हगवणे प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे.निलेश चव्हाण, जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. लाडकी बहीण योजनेतंर्गत निधी देण्यासाठी सारथी, बार्टी, महाज्योतीच्या निधीसोबत इतर खात्याचा निधी वळवला जात असल्याची बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले की, महिला आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. महिला आयोगावर पूर्णवेळ व्यक्तीची नियुक्ती करावी, वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप होत असल्याचेही रोहिणी खडसे यांनी सांगितले.