विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: जळगाव पोलीस नियंत्रणात कक्षात आलेल्या फोन कॉलमुळे एकच मोठी खळबळ उडाली. एका तरुणाने नियंत्रण कक्षाला फोन करत जळगावमध्ये ब़ॉम्ब फुटणार असल्याची माहिती दिली. पोलिसांना याची मिळताच सगळी यंत्रणा कामाला लागली. पण, तपासाअंती फोन करणाऱ्या तरुणालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं. या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना परिसरात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून “जळगावमध्ये बॉम्ब फुटणार” अशी खोटी माहिती दिली. पोलिस प्रशासनाने या धोकादायक माहितीकडे गांभीर्याने पाहत विविध यंत्रणांच्या मदतीने तातडीने तपास सुरू केला. मात्र, चौकशीअंती ही माहिती पूर्णतः खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेची दिशाभूल केल्यामुळे सार्वजनिक सुरक्षा यंत्रणेला फसवण्याचा गंभीर प्रकार घडला असल्याचे स्पष्ट होताच, पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये किरण पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, 112 या क्रमांकावर केवळ खरी आणि आपत्कालीन माहितीच द्यावी, असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले. खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होईल आणि संबंधितांना तुरुंगवासासह कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
हा प्रकार पोलिस यंत्रणेवर अनावश्यक ताण आणणारा असून समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा आहे. त्यामुळे अशा विनोद किंवा खोट्या माहितीला वाव न देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे